इथं शांतता राहते सीन १ — दररोज सकाळी उठल्यावर मुंबईतल्या हवेच्या प्रदुषणाचं मोजमाप मोबाईल अॅपवर पाहण्याची सवय झाली आहे. कधी १२९ तर कधी २०० आणि कधी चक्क २५० च्या पुढं इंडेक्स. रस्ते तुडुंब भरलेले वाहनांनी….धूर आणि कोलाहालातून वातावरणात पसरलेला एक विचित्र धुरकट आवाज. दूरदूरवरच्या टोलेजंग इमारती गढूळ हवेच्या चादरीआड गेलेल्या. आजूबाजूला एक वेगळीच दमट घुसमट पसरलेली. प्रत्येक जण शुद्ध हवेतला ऑक्सिजन शोधतोय आणि मिळेल त्या कणांवर झडप घालतोय. वळचणीतली कबुतरं उडण्याची इच्छा नसल्यासारखी आळसावून बसली आहेत. सीन २- नजर जाईल तिथं जांभ्याचं पठार आणि झुळझुळणाऱ्या वाऱ्यावर डोलणारं पिवळ धम्मक गवत. जरा जोरात वारा आला की त्याचीच सळसळ. मध्येच आपल्याभोवती गिरक्या मारणाऱ्या भुंग्यांची गुणगुण. तेवढ्यात कुठूनतरी एखाद्या पक्षानं दिलेली दमदार हाळी लक्ष वेधते. एकमेकांचा पाठलाग करणाऱ्या चिमण्या चिवचिवाटात भुर्रकन समोरून उडून जातात, तर समोर झाडाच्या फांदीवर बसलेल्या लाकुडतोड्याच्या टकटकीनं तंद्री लागून जाते. पठाराखालच्या किनाऱ्यावर आदळणाऱ्या सागरी ला...