दोन पाय आणि एक मन किती चाललो असेल अंदाजच येत नव्हता. पाय जणू काही खेचल्यासारखे आपोआप ओढत होते मला. एक लय आली होती सर्वांगाला. तो र्हिदम हवाहवासा वाटत होता. त्याचा तालबध्द नाद येत होता. खूप वेळ चालूनही थांबावसं वाटत नव्हतं हे आश्चर्य च होतं. कदाचित शरीर सूचनाही देत असेल थांबण्याच्या. पण मेंदू आता कुठलेही संदेश ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. वार्याच्या उबदार झुळकांव्यक्तिरिक्त संपूर्ण रस्त्यावर कणभरही अडथळा नव्हता. अगदी उलटं चालायचं ठरवलं असतं तरी खूप वेळ चालता आलं असतं. न काही धक्के बसण्याचा प्रश्न न कुणाची धडक बसण्याची भिती . या सुनसान रस्त्यावरून कुठलीही वाहनं धावत नव्हती. जणू काही हा प्रशस्त डांबरी रस्ता माझ्यासाठीच होता. सापाच्या लवलवत्या शेपटीसारख्या या रस्त्यावरुन चालतांना समोरच्या हिरव्यागार पर्वतांची शिख रं जवळ जवळ येताहेत की काय असं वाटायचं , कधी कधी तर मी चक्क डोळे मिटून चालायचो. अगदी मिनिट दोन मिनिटापेक्षा जास्त. असं केलं म्हणजे हवेत तरंगत तरंगत जातो आहोत असा भास व्हायचा. चालून ...