मरीन ड्राईव्ह


आज्जी नही दिखी … किधर है ? ठीक है नं? मी गार्डला विचारलं. “ हा कुछ तो फ्ल्यू ब्यू हुआ था. आज दोपहर मे बात की मैने. दूध लाके दिया था…” गार्ड आज्जीच्या फ्लॅटकडे पहात म्हणाला. पण मी त्याला ओलांडून कधीच आज्जीच्या खिडकीकडे पोहचलो होतो. मेहरा आजी रहात होती सांज सुरज बिल्डींगच्या तळमजल्यावर. तिथं जाणं माझ्यासाठी नवं नव्हतं. अर्थात मी थेट कधीच तिच्या घरी गेलो नाही, तिनं बोलवूनही नाही. पण बाहेर उभा मी आणि खिडकीत ती अशा अनेक वेळा गप्पा झाल्या होत्या आमच्या. गार्डसना सुद्धा ते माहित होतं, त्यामुळं आत्ताही त्यानं लक्ष न देता खिशातून पुडी काढून तोंडात रिकामी केली.

“आज्जी.. आज्जी….” मी हातानेच खिडकीचा पडदा बाजूला करून आवाज दिला. दूर समुद्रात सूर्य मावळत होता. आज वर्किंग होतं, त्यामुळं मरीन ड्राईव्हवर तुरळकच लोकं होती. काही छोटी मुलं कुत्र्यांच्या पिल्लांबरोबर मस्ती करत होती. आजीच्या फ्लॅटमध्ये अंधार दाटत होता. समोर पापुद्रे उडालेल्या भिंतीवर मेहरा अंकलच्या फोटो टांगलेला आणि खाली पणती. तेवढाच काय तो प्रकाश. आतमधून काहीतरी खुड्बुडले आणि आजी दिसली. काठी टेकत टेकत आजीची आकृती खिडकीशी आली, मंदसे हसून गजाला पकडलेल्या माझ्या मुठी आपल्या रोडक्या हातात घेतल्या. “ आज्जी काय दिसली नाही म्हणून पाहायला आलो… कशी आहे तब्येत ? लाईट तर लावा घरातले..” मी म्हणालो. “अरे बेटा ट्यूब गेली आहे, मी मीनाला बोलले आहे, ती सकाळी नवीन लावेल. माझं काय काम आता हॉलमध्ये? जरा अशक्तपणा आहे. खीर खाऊन झोपणारचं आहे.” आजी कसनुसे बोलली. तिचा गोरापान चेहरा पार ह्डकला होता. सुरुकुत्या वाढल्यासारख्या वाटत होत्या. “येता का आत्ता फिरायला? नेतो मी. येऊ अर्ध्या तासात” मी विचारलं. “ नही बेटा अभी नही.. दो तीन दिन के बाद नक्की जाऊ. इथून खिडकीतून बघते की मी” आजीनं टाळलं. असंच इकडंचं तिकडचं विचारून मी निरोप घेतला. जातांना आजीने आग्रह करून करून एक राजगिरा चिक्की हातात कोंबलीच.

मागच्या आठवड्यातच आज्जीचा ७५ वा वाढदिवस मरीन ड्राईव्हवर केक कापून साजरा केला होता.. बरोबर होती काही भटकी कुत्री, काही कावळे आणि उड्या मारणारी दोन चार नेहमीची मुलं. सोसायटीतल्या आजीच्या दोन म्हाताऱ्या मैत्रिणी पण होत्या.

सहज आठवत गेलं. आज जिथं बसलो होतो तिथे वॉक करून नेहमी येऊन बसायचो. तिथंच आजी येऊन बसलेल्या असायच्या. अंगभर पदर लपेटलेला, त्यावर लोकरीची शाल आणि हातातली काठी सावरत बसलेल्या आजीबरोबर असंच एकदा बोलायला सुरुवात केली आणि नंतर गाढ मैत्रीच झाली. त्यांची बिल्डींग समोरच. तासभर बसून त्या निघायच्या. कुणी ना कुणी त्यांना रस्ता ओलांडायला मदत करायचा. माझी त्यांची चांगली ओळख झाल्यावर अर्थातच ते काम माझ्याकडे आलं. त्यांना घरी सोडायचं, खिडकीतून हात हलवत निरोप घ्यायचा आणि मग घरी जायचं हे ठरलेलं होतं.

एकदा त्या एकट्याच बसल्या होत्या. त्याचं अंग गदगदत होतं. त्या थरथरत होत्या. जवळ जाऊन विचारलं तर आपला हडकुळा हात माझ्या हातात धरला. त्यांच्या आसवांनी माझा हात भिजला. मेहरा काकांचा आज वाढदिवस होता. दादरमध्ये मोठं रेडीमेड कापडाचं दुकान असलेले मेहरा काका वर्षभरापूर्वी अचानक गेले. आजी मूळच्या भोपाळच्या. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचं लग्न मेहरा काकांशी झालेलं. एक मुलगी झाली, शिकली बिकली आणि एका मुस्लीम इंजिनिअरशी लग्न करून झाली सौदीत स्थिरस्थावर. साहजिकच मुलीशी अबोलाच होता. नाही म्हणायला वडील गेल्यावर दोन तीन दिवसांसाठी आली आणि गेली सुद्धा. मेहरा काकांनी दुकानाला मोठं करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलं होतं शिवाय एक दीड कोटी रुपये आपल्या चुलत्याकडून घेतले होते. पण दुकानाचा वाद सुरु झाला. त्यात मिळकतही किरकोळ. मरीन ड्राईव्हवरचा वडिलोपार्जित छोटा फ्लॅट एवढीच काय प्रॉपर्टी उरलेली. चुलत्यानं दावा ठोकला. दुकानाला सील लागलं. शांत स्वभावाच्या मेहरा काकांना धक्का सहन झाला नाही. आजपर्यंत काकांनी कधी आपल्या बायकोच्या पायाला काटा रुतु दिला नव्हता, ती आयुष्याच्या संध्यासमयी असहाय झाली. चुलत्यानं आजीला फ्लॅटमध्ये राहायला देऊन उपकारच केले होते. तरुणपणी एषोरामात राहिलेल्या आजींवर दर महिन्याला पाच सात हजार रुपये चुलत्याकडून घेण्याची वेळ आली.

“ बेटा, सॉरी. मुझे रोनेका नही था. लेकीन क्या करू? मै बिल्कुल भूल नही सकती कुछ भी. या इथं मरीन ड्राईव्हवर जिंदगीतलं सगळं सुख मी घेतलं. राजीव के साथ कैसे सालोसाल बिते, पता नहीं चला. सुवर्णा भी इधर ही पिछे गिरगाव के हॉस्पिटल में पैदा हुई थी. उसका बचपन, स्कुल, कॉलेज के दिन. हमारी सारी ख़ुशी हमेशा इधर बैठती हूँ तो याद आती है. हम सब के बर्थ डे केक यहाँपर ही कटते थे. राजीवचे दोस्त लोग यायचे. आम्ही खुप मजा करायचो. घूमने को जाते थे इधर उधर. मी लग्न होऊन इथंच आले पहिल्यांदा, तोपर्यंत मुंबई कधी पाहिलीच नव्हती. मरीन ड्राईव्ह माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार आहे. कभी गुस्सा होती तो इधर आकर बैठती थी. राजीव पिछे पिछे आता था. फिर आइस कैंडी खिला के शांत करता था मुझे. एकबार तो वो किसीसे झगड़ा कर आया, और आके बैठ गया इधर. तो मै खानेका पूरा प्लेट ढककर लेके गई और उसको उधरही खिलाया था रातको. सुवर्णा के साथ तो कितना खेलते थे हम यहाँ पर. तिला आणि मला कुत्रे आवडायचे. आम्ही काहीतरी खायला घेऊन यायचो इथे दररोज. मग सगळे जमायचे आमच्याभोवती. कितने साल हुए लेकिन ऐसा लगता है की राजीव और सुवर्णा इधरही कही खेल रहे है. उनका आवाज मुझे बार बार आ रहा है. मै घर जाती हुं तो अचानक लगता है, राजीव मुझे बुला रहा हैं, असं काहीसं पुटपुटत आजी हळूहळू काठी टेकत चालू पण लागल्या.

यावेळी ऑफिसचा दौरा जास्तच लांबला. पंधरा दिवसानंतर घरी आलो. रात्र झाली होती पण फ्रेश होऊन मरीन ड्राईव्हची नेहमीची जागा गाठली. सांज सुरज बिल्डींग समोरच दिसत होती. आजीच्या फ्लॅटमध्ये लाइट होता. पण रात्र खूप झाली होती म्हणून तिकडं मुद्दामहून गेलो नाही. पण मला पाहून प्रीतम सिंग तंबाखू मळत मळत रस्ता क्रॉस करून आला. कित्येक वर्षांपासून तोच सांज सुरजची रखवालदारी करायचा. “काय म्हणतो प्रीतम ?” तो जवळ आल्यावर मी विचारलं.” कुछ नही साब. किधर ते आप? दिखे नही. आजी ने आपको बहुत याद किया.” प्रीतम म्हणाला. “कैसी है आज्जी? इतनी रात लाईट अभी चालू कैसे?” माझी आपली उत्सुकता. “साब, वही तो मै बोल रहा था. आज्जी पर्मनंटली गई यहासे” मला सुचेचना काय बोलावं ते.” आपको ये दिया हैं ” असं म्हणत हातातलं बोचकं काढून प्रीतम ने माझ्या हातात ठेवलं आणि शांतपणे कठड्यावर पाय ताणून काळ्याशार पाण्यात डोलणाऱ्या होडीच्या दिव्याकडे पाहत म्हणाला “ आज्जी भोपाल गई. उधर कोई तो वृद्धाश्रम है. जाते वक्त बहोत रो रही थी. बार बार गाडी से इधर समंदर की तरफ देख रही थी. जाते जाते भी मूड मूड कर पीछे ही देख रही थी. आपका बार बार नाम लिया और ये थैली दी.”

मला दाटून येत होतं. तसाच आवंढे गिळत मी ती गुलाबी शबनम उघडली. ही नेहमी आजीच्या खांद्यावर असायची. बॅगमध्ये मेहरा काकांच्या फोटोची रंग विटलेली फ्रेम, निरांजन, त्यातल्या अर्धवट जळलेल्या वाती तशाच तेलकट, फोटो पुसायचा छोटा टर्किश रुमाल, आणि काकांबरोबरचे आज्जीचे तरुणपणातले चार पाच छोटे ब्लॅक एंड व्हाईट फोटो होते. एक छोटी कागदी चिट्ठी घडी करून टाकलेली, ती मी वाचायला उघडली. त्यातल्या थरथरत्या वेड्यावाकड्या अक्षरांचा अर्थ कळेपर्यंत माझे डोळे डबडबले आणि सगळं धूसर होऊन गेलं.

“मै जा रही हुं. लेकिन एक काम करना. ये थैला और सब फोटो समंदर मे डाल देना. दूर ले जाके डालना. आज्जी का ये आखरी काम करना बेटा. मुझे आज्जी कहनेवाला कोई नही. सिर्फ तुम हो. मै मरुंगी लेकीन इस जगह पे आते रहना, शायद मै यही मिलुंगी.”

जिथं आज्जीची फेवरेट जागा होती तिथे म्हणजे प्रिन्सेस स्ट्रीट पुलाजवळ मोठमोठ्या क्रेन्स अणुकुचीदार दात किनाऱ्यावर खुपसत होत्याचं नव्हतं करताहेत. कोस्टल रोडचं काम जोरात सुरु आहे. तिथं फिरणं काय पण पायी चालणं सुद्धा आता शक्य नाही, पण कधीमधी माझी चक्कर त्या राड्यारोड्यातून असते. कचरा वेचणाऱ्यांप्रमाणे सारखं काहीतरी धुंडाळत….

— अनिरुद्ध अष्टपुत्रे

Anirudha Ashtaputre

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एमओयु