एमओयु
“ शेखर, धिस इज दि लास्ट चान्स.
दोघांची वार्षिक परीक्षा आहे. जमलं तर ठीक, नाही तर माझं एक्झिट ठरलं आहे. तू आणि कंपनी पाहून घ्या काय
ते?” सरपोतदार साहेबांनी
शेखरला निर्वाणीचं सांगितलं. केबिनमध्ये आणखीही दोन डायरेक्टर्स होते. त्यांच्या
चेहऱ्यावरून परिस्थिती किती बेकार आहे ते कळतच होतं. शेखरनं उसनं अवसान आणून हो
म्हटल्यासारखं केलं. पण एकूणच त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ दिसत होता.
दोन वर्षापूर्वीच सीईओ म्हणून जॉईन झालेला शेखर अहमदाबाद आयआयएम पासआऊट होता.
स्टुडंट ऑफ दि इयर होता. इथं खुद्द चेअरमन राजीव चक्रवर्ती यांनी दोन तीन
मुलाखतींनंतर त्याला सिलेक्ट केलं होतं. स्टार्टअप म्हणून पाच वर्षांपूर्वी सुरु
झालेल्या अहमदाबादच्या या छोट्याशा फ्युचर साऊंड कंपनीची उलाढाल १०० कोटीपर्यंत
पोहचत होती. मुंबईत त्यांनी एक पॉश कॉर्पोरेट ऑफिस सुरु केलं होतं, आणि त्या दरम्यानच शेखरची मुलाखत झाली होती.
कंपनीला आता सातासमुद्रापलीकडचे वेध लागले होते. चक्रवर्ती साठ वर्षांचेच होते ,
पण त्यांचे राजकीय कनेक्शन आणि एकूणच सगळीकडचा
वावर यामुळे त्यांनी काही वर्षांतच कंपनीला बरे दिवस आणले होते..
फ्युचर साऊंड ला ईव्हीट्रॅक या कंपनीची मोठी स्पर्धा होती. त्यांच्यात विस्तव
सुद्धा जात नव्हता. इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केट मोठं होतं होतं. अशा खासगी आणि
सार्वजनिक इलेक्ट्रिक वाह्नांसाठी अद्ययावत साऊंड सिस्टीम निर्मिती करणाऱ्या या
कंपन्या होत्या. अशा सिस्टिम्ससाठी जे उत्कृष्ट प्रतीचे सेमी कंडक्टर्स लागायचे ते
पुरविणाऱ्या अटलांटा येथील ऑरिअल कंपनीची जगात जणू मक्तेदारी होती. याच कंपनीशी
एमओयु करण्याची जबाबदारी मुंबई ऑफिसच्या सरपोतदार-शेखर जोडगोळीवर होती. पुढच्या
तीन वर्षासाठी हे सेमी कंडक्टर्स पुरवण्यासाठी हा एमओयु होता. अर्थातच
प्रतिस्पर्धी ईव्हीट्रॅक कंपनी ते कसं होणार नाही हे पाहत होती. हा एमओयु झाला तर
फ्युचर साऊंड कंपनीची केवळ विक्रीच तिप्पट होणार नव्हती तर आशियातलं मार्केट ओपन
होणार होतं.
अटलांटाहून या एमओयुसंदर्भात चर्चा करण्यासाठी ऑरिअल कंपनीचे एक भागीदार आणि
सीईओ विल्सन स्वत: मुंबईत येत होते. भारतात काही दिवस सुट्टीसाठी ते येणार होते हे
जेव्हा चक्रवर्ती साहेबांना कळलं तेव्हा त्यांनी कामात काम म्हणून या व्हिजीटमध्ये
एमओयुवरही चर्चा होऊ शकते असे कसेबसे त्यांच्या गळी टाकले होते, आणि त्याप्रमाणे दोन दिवसांत फ्युचर साऊंडच्या
मुंबई कॉर्पोरेट ऑफिसात ते येणार होते. मात्र मुंबईहूनच त्यांना पुढे अमेरिकेला
पहाटेचं फ्लाईट होतं आणि चक्रवर्ती साहेबांनी खूपच आग्रह धरल्याने ते हो म्हणाले
होते.
दहा वर्षांपासून मार्केटमध्ये असलेल्या ईव्हीट्रॅक कंपनीलाच सेमी कंडक्टर्स
पुरवावेत या मताचे विल्सन होते. त्यामुळं शेखरसमोर मोठ्ठं आव्हान होतं. विल्सन
सकाळीच ऑफिसमध्ये आले, त्याचं
महाराष्ट्रीय पद्धतीनं सुवासिनींनी औक्षणाने स्वागत केले. तुतारीही वाजवण्यात आली.
आपल्या कठोर चेहऱ्यावर औपचारिक हसू आणून हात दाखवत आणि शेकहँड करीत विल्सन मिटिंग
रूममध्ये पोहचले. अमेरिकेहून खास या बैठकीसाठी त्यांची असिस्टंट मॅनेजर जेनी आणि
आणखी दोघे येऊन पोहचले होते. मिटिंग सुरु झाली. महिन्यातून किती सेमी कंडक्टर्सचा
पुरवठा होणार, त्याचे दर,
सवलती असे काही महत्वाचे वादाचे मुद्दे होते,
ज्यावर सहमती होता होत नव्हती. गेल्या वर्षीही
चक्रवर्ती साहेब अटलांटाला गेले असतांना याच मुद्द्यांवर त्यांना हात हलवत माघारी
फिरावे लागले होते. एक स्टार्टअप कंपनी म्हणून काहीसा तुच्छ वागणुकीचा अनुभवही
त्यांना आला होता. मुंबईत ही मिटिंग ठरली पण चक्रवर्ती हॉस्पिटलमध्ये एडमिट होते
आणि व्हिसीवरून सहभागी झाले होते. विल्सन आणि त्यांची टीम अमेरिकन उर्मटपणा दाखवत
आपल्या मुद्द्यांवर एकदम अडून होती. त्या सगळ्यांचा अति आत्मविश्वास, समोरच्याला नमविण्याची त्यांची बॉडीलँग्वेज,
यामुळं शेखर आणि टीम घामेघूम झाली होती.
हे आता जमणारच नाही अशा मनस्थितीत आलेला शेखर निराशेनेच प्रेझेन्टेशन स्लाईड्स
दाखवत होता. काहीतरी बोलायचं म्हणून त्यानं विल्सन बसलेल्या खुर्चीकडे पाहिलं तर
ते दिसलेच नाहीत….. बघतो तर काय
टेबलाखाली वाकलेले विल्सन परत खुर्चीवर प्रकटले.. त्यांच्या हातात होती डॉली!.
दुधासारखी पांढरी शुभ्र आणि अंगावर सोनेरी चट्टे असलेली गुबगुबीत छोटी माऊ. अंग
ताठ करून नखं बाहेर काढून म्यांव म्यांव असा निषेधाचा सुरु काढूनही विल्सननी
डॉलीला सोडले नाही. त्यांनी तिला पुढ्यात ठेवलं……. त्यांचा कठोर चेहरा क्षणार्धात एखाद्या आनंदी, खट्याळ मुलासारखा झाला होता. मध्येच दोन्ही
हातांनी तिला उंच धरून तिच्याशी ते लाडीकपणे बोलू लागले. डॉलीनं सगळी मिटींगच
थांबवली. शेखरला प्रचंड कानकोंडल्यासारखं झालं. या कंपनीत शेखरची अपॉइंटमेंट आणि
डॉलीचं आगमन एकदमच झालं होतं. लहानपणापासून मार्जारप्रेमी शेखरनं या गोड पिल्लाला
आपल्या पॉश केबिनमध्ये आसरा दिला. त्याच्या राहण्याची कोपऱ्यात सोय केली. त्याला
खेळायला टेबल टेनिसचे बॉल आणून दिले. डॉलीची आई तिला जन्म देऊन कुठेतरी पसार झाली
होती. त्यामुळे शेखरच तिचा आई बाप होता. अख्या कंपनीत डॉलीला सगळे प्रेमानं वागवत,
तिचे लाड करत. शेखर जिथे जाईल तिथे ती
बॉडीगार्डसारखी पायात पायात असायची. तिला सगळीकडे प्रवेश होता.., अगदी बोर्ड रुममध्ये सुद्धा.
विल्सन आणि त्याच्या टीमनी आता इंग्रजीत बोबडे बोबडे चित्रविचित्र आवाज काढून
काहीतरी डॉलीशी बोलायला सुरुवात केली. एकीनं कॅडबरी काढून तिला दिली. तर विल्सनने
फक्त तिचा पापाच घ्यायचा ठेवला होता. या हातातून त्या हातात डॉली मस्तपैकी फिरत
होती. टेबलावरच्या विल्सनसमोरच्या बिस्किट्स पण तिनं खाऊन टाकल्या. शेखर तिला
पकडायला पुढे धावला तर विल्सननं त्याला अडवलं. फ्युचर साऊंडची टीम हतबुद्ध होऊन जे
काही चालले ते पाहत होती. चक्रवर्ती साहेब व्हीसीवर पूर्ण स्तब्ध. आता जेनीने
मोबाईल काढून तिचं शुटींग केलं, तिला जवळ घेऊन
गालावर घासलं. डॉलीने सुद्धा आपला मऊ मऊ पंजा तिच्या नाकावर ठेऊन एकप्रकारे तिला
पसंती दिली. डॉलीला बळजबरीने विल्सनच्या हातातून घेतांना शेखर आणि त्याच्या एक दोन
असिस्टंटला नाकी नऊ आले. सगळे जिकडे तिकडे विखुरले गेले होते. एकमेकांत गप्पा मारत
होते. प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या कॅटसचं कौतुक करत होते, खोड्या, गंमतीजमती सांगत होते. भारतात आल्यानं दोन चार दिवसांपासून
आपण आपल्या कॅटला किती मिस करतोय तेही सांगून झालं. इतक्यात विल्सननं सुद्धा
शेखरला जवळ बोलावून डॉलीविषयी उत्सुकतेनं आणि कौतुकानं विचारलं. अर्धा तास त्यातच
गेला. मध्येच चहा आणि ब्रेकफास्ट म्हणून गरमागरम बटाटेवडे आले. विल्सनसह सगळे
त्याच्यावर तुटून पडले. डॉलीही चाबरट होती. तीही विल्सनला सोडायला तयार नव्हती.
त्याच्याकडून खूप लाड करून घेणं सुरु होतं.
थोडं वातावरण स्थिरस्थावर झालं… आणि विल्सनने सगळ्यांना सीटसवर बसायला सूचनावजा ऑर्डरचं सोडली. शेखरही
आज्ञाधारकासारखा बसला. “Mr. President…..” स्क्रीनवर दिसणाऱ्या चक्रवर्ती यांच्याकडे पाहून त्यानं बोलायला सुरुवात केली.
“ Sorry for all this. But I must tell you that we are ready to think it
positively in the discussion that took place here. We have confidence in your
abilities, but will sortout some issues with our president and finalize this
MoU in next week through VC. But we have one condition. Please include a photo
of this lovable doll in your product logo. The best sound in the world is when
a cat purrs. And this buzz of love, which is buzzing around the EV vehicles,
will become truly harmonious.”
नर्सला काही कळायच्या आत चक्रवर्ती साहेब सलाईनची नळी काढून उभे राहिले होते.
थरथरत्या हाताने त्यांनी समोर लॅपटॉपवर दिसणाऱ्या विल्सनना कडक सॅलयूटच ठोकला.
त्यांना गलबलून आलं होतं…शब्द कसला पडतो
तोंडातून…
…….. विल्सन आणि टीमला ऑफिसबाहेर निरोप देताक्षणी शेखरच काय पण
सरपोतदारांपासून सगळेजण आतमध्ये अक्षरश: पळाले. डॉली… डॉली असे हाकारे सुरु होते आणि डॉली मात्र सुनसान बोर्ड
रूममधल्या टेबलावर आडवं पडून माईकच्या वायरशी खेळत बसली होती.
— — अनिरुद्ध अष्टपुत्रे
Anirudha Ashtaputre

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा