दोन पाय आणि एक मन
किती चाललो असेल अंदाजच येत नव्हता. पाय जणू काही खेचल्यासारखे आपोआप ओढत होते मला. एक लय आली होती सर्वांगाला. तो र्हिदम हवाहवासा वाटत होता. त्याचा तालबध्द नाद येत होता. खूप वेळ चालूनही थांबावसं वाटत नव्हतं हे आश्चर्यच होतं. कदाचित शरीर सूचनाही देत असेल थांबण्याच्या. पण मेंदू आता कुठलेही संदेश ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. वार्याच्या उबदार झुळकांव्यक्तिरिक्त संपूर्ण रस्त्यावर कणभरही अडथळा नव्हता. अगदी उलटं चालायचं ठरवलं असतं तरी खूप वेळ चालता आलं असतं. न काही धक्के बसण्याचा प्रश्न न कुणाची धडक बसण्याची भिती. या सुनसान रस्त्यावरून कुठलीही वाहनं धावत नव्हती. जणू काही हा प्रशस्त डांबरी रस्ता माझ्यासाठीच होता. सापाच्या लवलवत्या शेपटीसारख्या या रस्त्यावरुन चालतांना समोरच्या हिरव्यागार पर्वतांची शिखरं जवळ जवळ येताहेत की काय असं वाटायचं, कधी कधी तर मी चक्क डोळे मिटून चालायचो. अगदी मिनिट दोन मिनिटापेक्षा जास्त. असं केलं म्हणजे हवेत तरंगत तरंगत जातो आहोत असा भास व्हायचा. चालून चालून पायातल्या संवेदना नाहिशा झाल्या होत्या. एखाद्या किल्ली दिलेल्या खेळण्यासारखे चालतच होते ते. पण ही किल्ली कधी तरी थांबेल, कधीतरी त्या स्प्रिंगचा वेढा पूर्ण मोकळा होईल आणि मग अचानक हे पाय थांबतील. पण कधी ? कुठून आली ही शक्ती माझ्यात ? इतकं चालायची ?
अचानक मला मुंबईची आठवण आली आणि एकदम पायात गोळे आल्यासारखे वाटले, पण क्षणभरचं ! दिवस असो नाहीतर रात्र, असंख्य पायांनी आणि चाकांनी हे शहर नुसतं धावतंय. लाखो लोक इकडून तिकडं
जातायंत. घरून निघून कामाच्या ठिकाणी आणि परत घराकडे असा प्रवास अखंड सुरु आहे.
अनन्वित शारीरिक आणि मानसिक छळानं शरीरं गलितगात्र होऊन रात्री अंथरुणावर पडतात ती
सकाळी परत ताज्या दमानं उठण्यासाठी, दर महिन्याकाठी डॉक्टरांचे उंबरठे झिजवतात. कुणाला श्वासाचा त्रास आहे तर
कुणाला प्रचंड धाप लागते. कुणाच्या पोटर्यात गोळे येतात तर कुणाला छातीत दुखतं.
मनाला शांतता नाही. शांततेचा आवाज कसा असतो ते ठाऊक नाही. दर सेकंदाला कोलाहल आणि कलकलाट वाढतोय. आमचे दातार डॉक्टर अनुभवी आणि हुशार. गेल्या ५० वर्षांपासून एकाच व्यायामावर त्यांचा विश्वास
गाढा. मोठ्या अभिमानाने एकच गोष्ट ते सगळ्यांना सांगतात, ' वॉक-वॉक'. चाला आणि दीर्घायुष्यी राहा हा मंत्र ते औषधांच्या पुडीबरोबर सगळ्या पेशंटना न
चुकता देतात. एकदा त्यांनी मला हाच उपदेश दिला. मी पण प्रामाणिक विद्यार्थ्यासारखी
मान हलवून उद्यापासून सुरु करतो असं सांगितलं. सोप्पा वाटला मला हा व्यायाम. दोन दिवसातच डॉक्टरांचा सल्ला प्रत्यक्षात उतरवणं किती अवघड
आहे ते कळालं. सकाळ असो नाहीतर संध्याकाळ, लोकं तुम्हाला
जणू चालू द्यायचं नाही असं ठरवून आलेले असतात. सकाळी बिल्डिंगच्या बोळकांडातून वाट
काढत मुख्य रस्त्यावर यायचा अवकाश की चेहरा ओढणीने संपूर्ण झाकलेली झाडूवाली
धुळीचे लोट तुमच्या अंगावर उडवते. दुसर्या क्षणी कचर्याचे डंपर्स गर्जना करीत तुमच्या
बाजूने जातात. दुधाच्या गाड्यांची ये- जा, अधून मधून पेपर्सचे गट्ठे घेऊन सायकलवर जाणारे स्वार. सकाळच्या शिफ़्टवाल्यांना
स्टेशनवर पोहचविण्यासाठी खचाखच भरलेल्या रिक्षांची लागलेली स्पर्धा आणि आवाज करीत
जाणार्या बसेस. सलग ५ मिनिटे तुम्ही चालून दाखवा. मैदानांवर जाण्यासाठी ती आधी
हवीत ना ? कसं करणार मन तणावमुक्त ? पहाटे सुध्दा हे शहर शांत नाही. कधी रस्त्यावर
मिणमिणते लाईट्स आहेत तर कधी नाहीत. रस्त्यावर मध्येच पेंगणारी जनावरे, भुंकणारे कुत्रे , पाण्याचे- नाल्याचे ओघळ चुकवता चुकवता मॉर्निंग
वॉक संपतो.
चालता चालता अचानक थांबावसं वाटलं. थांबलो. रत्याच्या
मधोमध. डोळे शांतपणे मिटून एका सुखद अनुभुतीला शरीरभर खेळवत उभा राहिलो. चैतन्याची
एक लहर मेंदूपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत खेळत असलेली जाणवली. उबदार वार्याच्या
झुळ्कीनं अंगावर शिरशिरी येत होती. रस्त्याच्या मधोमध उभा होतो- पुतळ्यासारखा. पायात अंतर ठेवून! सहजच मागे पाहिले. दूर
क्षितीजावर आमच्या कॅम्पमधल्या एका तंबूवरचा झेंडा चिटोर्यासारखा फ़डफ़्डतांना दिसत
होता.घड्याळात पाहिलं. ८.३० झाले होते. चक्क दीड तास झाला होता चालून चालून. आठ-
दहा किलोमिटर्स चाललो असेल. पण पाय थकले नव्हते, दम तर अजिबात
लागला नव्हता. आजुबाजुला छानसं दव पडलं होतं. रस्त्याच्या दुतर्फ़ा मोठे माळरान, नजर जाईल तिथपर्यंत गवतच गवत. वार्यावर पिसारा फ़ुलवत डोलणारे पिवळे तांबूस.
समोर गवताच्या जंगलात लुप्त होणारी ही सडक जिथे वळण घेत
होती तिथे एक मोठ्या टपरीवजा काहीतरी दिसत होतं. तिथून ऐकू येणार्या
पहाडी लोकसंगिताच्या स्वरांनी आपसूकच मला ओढून नेलं. तो होता एक पेट्रोल पंप.
शेजारीच पत्रा आणि गवताच्या आच्छादनाने बनविलेली केबिन.
बाजूला लाकडी फ़ळकुटाचं ढाबावजा हॉटेल. त्याबाहेरच्या खाटेवर जरा विसावलो. एक खटारी
जीप पेट्रोल भरुन डोंगराच्या दिशेने नाहिशी झाली, पण दूरदूर जाणारा
आवाज तेवढा कानात घुमून राहिला होता. तेवढीच काय ती वर्दळ. एखाद्या अमेरिकन चित्रपटातल्या कंट्रीसाईडसारखे
दृश्य होतं ते. वातावरणात सगळीकडे करडा तांबूस रंग भरुन राहिला होता, जणू ब्राऊन कॅनव्हासच. माझ्यासकट सगळा परिसर त्या चित्राचा एक भाग झालायं असं
वाटलं क्षणभर! एवढं चालल्यावर भूक सडकून लागावी ना. पण पोटानंही आज पायांचं ऐकायचं ठरवलं होतं. फ़क्त चहाची छानशी तल्लफ़ होती.
काचेच्या भल्यामोठ्या ग्लासमधून वाफ़ाळलेल्या चहाचे घुटके घेतांना येणारी मजा
अवर्णनीय होती. पहाटे कॅम्पमधून निघालो तेव्हा कुणी उठलं नव्हतं. आजचा दिवस ब्रेक
दिला होता, म्हणजे सुट्टी. पाहिजे तिकडे फ़िरा. रात्री
कॅम्पमध्ये परता. खाण्यापिण्याचं काही बंधन नव्हतं.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा