इथं शांतता राहते

सीन १ — दररोज सकाळी उठल्यावर मुंबईतल्या हवेच्या प्रदुषणाचं मोजमाप मोबाईल अ‍ॅपवर पाहण्याची सवय झाली आहे. कधी १२९ तर कधी २०० आणि कधी चक्क २५० च्या पुढं इंडेक्स. रस्ते तुडुंब भरलेले वाहनांनी….धूर आणि कोलाहालातून वातावरणात पसरलेला एक विचित्र धुरकट आवाज. दूरदूरवरच्या टोलेजंग इमारती गढूळ हवेच्या चादरीआड गेलेल्या. आजूबाजूला एक वेगळीच दमट घुसमट पसरलेली. प्रत्येक जण शुद्ध हवेतला ऑक्सिजन शोधतोय आणि मिळेल त्या कणांवर झडप घालतोय. वळचणीतली कबुतरं उडण्याची इच्छा नसल्यासारखी आळसावून बसली आहेत.

सीन २- नजर जाईल तिथं जांभ्याचं पठार आणि झुळझुळणाऱ्या वाऱ्यावर डोलणारं पिवळ धम्मक गवत. जरा जोरात वारा आला की त्याचीच सळसळ. मध्येच आपल्याभोवती गिरक्या मारणाऱ्या भुंग्यांची गुणगुण. तेवढ्यात कुठूनतरी एखाद्या पक्षानं दिलेली दमदार हाळी लक्ष वेधते. एकमेकांचा पाठलाग करणाऱ्या चिमण्या चिवचिवाटात भुर्रकन समोरून उडून जातात, तर समोर झाडाच्या फांदीवर बसलेल्या लाकुडतोड्याच्या टकटकीनं तंद्री लागून जाते. पठाराखालच्या किनाऱ्यावर आदळणाऱ्या सागरी लाटांचा खळखळखळाट तेवढा निरव शांततेचा भंग करतोय. पश्चिमेकडं चंद्रकोरीसारख्या विस्तीर्ण पिवळ्या पठारानं आपल्या कवेत घेतलेला निळ्याशार समुद्र आणि त्यात दूरवर डोलणाऱ्या मासेमारी बोटी म्हणजे अगदी पोस्टरवरचं चित्रच जणू… हे सगळं निवांतपणे पहात एका टोकावर पहुडलेला गगनगिरी महाराजाचा छोटा, साधासा कौलारु आश्रम. आणि शेजारी जुन्या पद्धतीचं दत्त मंदिर.
बाकी आश्रम म्हटलं की, डोळ्यासमोर येणारा कसलाही डामाडौल किंवा दिखाऊपणा, भक्तांची गर्दी, स्पीकरवरून चाललेल्या आरत्या वगैरे इथं काहीही नाही हे पाहून मन शांत होऊन जातं. आश्रम सांभाळणारे श्याम करंगुटकर, सरपंच पत्नी आणि त्यांचं छोटं कुटुंब किती वर्षांची ओळख असल्यासारखं तुमचं स्वागत करतात. आश्रमातल्या चुलीवर आमटी-भाताचा प्रसाद होतो. दुपारी निवांतपणे आश्रमाच्या परिसरात फिरून मग एखाद्या झाडाखाली ताणून द्यायची. तुम्हाला दोन तीन दिवस राहायचं असेल तर येतांना गावातून भाजीपाला, आवश्यक जिन्नस घेऊन यायचे. स्वत:च्या हातानं नाश्ता करा, स्वयंपाक करा किंवा शामराव आनंदानं करतातच. अगोदर सांगितलेलं असलं म्हणजे स्वयंपाकासाठी बरं पडतं.
मी सांगतोय ते राजापूर तालुक्यातल्या आंबोळगडमधल्या आश्रमाविषयी. हे ठिकाण रत्नागिरीहून आडीवरे- नाटे मार्गे ६० किमी अंतरावर तर राजापूर-नाटे अशा रस्त्याने ३४ किमी अंतरावर आहे. नाटेपासून आंबोळगड जवळच म्हणजे ७ किमी अंतरावर आहे. तेवढाच रस्ता लहान आणि खराब आहे पण लवकरच मोठ्या रस्त्याचे काम सुरु होतेय. रत्नागिरी एसटी बस स्थानकातून बसेस तसेच शेअर तत्वावर रिक्षा, सुमो वगैरे वाहने मिळतात. चार साडेचारशे लोकवस्तीचं हे गाव इथल्या सुंदर आणि शांत समुद्र किनाऱ्यासाठी ओळखलं जातं.
राजापूर तालुक्यात आंबोळगड व यशवंत गड हे किल्ले आहेत. ब्रिटीशांच्या काळात राजापूर बंदरामध्ये जैतापूरमार्गे मालवाहतूक जहाजे, गलबते मुसाकाजी बंदरातून जात असत. या प्राचिन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड हा गढीसारखा किल्ला बांधण्यात आला. १८१८ मध्ये कर्नल इमलॉकने कान्होजी आंग्रेकडून हा किल्ला जिंकला अशी नोंद आहे. इतर काही फार घटना या किल्ल्याशी संबंधित दिसत नाहीत. १८६२ नंतर आंबोळगडावरील वस्ती उठली. या किल्ल्यापासून पुढे अर्धा किलोमीटर पठारावरचा छोटा रस्ता या गगनगिरी आश्रमाकडे जातो. पश्चिमेकडे पठाराच्या टोकावर आश्रमात पोहचलात की खाली अथांग समुद्राचे नयनरम्य रूप दिसतं. गगनगिरी महाराज दत्तमंदिर आश्रम, आंबोळगड अशी पाटी लिहिलेली पडकी कमान आपलं स्वागत करते.
गगनगिरी महाराजांनी पहिल्यांदा मुसाकाजी बंदराला भेट दिली तेव्हा ते या जागेच्या प्रेमातच पडले. पठारावर गेल्यावर तर त्यांनी या जागेला तपोभूमी करण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे पठाराच्या ४० ते ५० फुट खाली असलेली एक गुहा त्यांच्या तपश्चर्या करण्याचं ठिकाण बनलं असं सांगण्यात येतं. महाराज इथं वास्तव्याला आले म्हटल्यावर होणारी गर्दी लक्षात घेऊन त्याकाळी सरकारनं थेट राजापूर आणि रत्नागिरीहून आश्रमापर्यंत दिवसभरातून चार पाच एसटी बसेसच्या सेवा सुरु केल्या, विशेष म्हणजे त्या आजपर्यंत सुरु आहेत.रात्री तर तीन एसटी इथे मुक्कामी असतात. पर्यटकांसाठी गावात आणि परिसरात घरे, रिसोर्टमधून जेवण्या राहण्याची सोय आहे.
इथे कोल्हे मोठ्या प्रमाणावर आहेत. काही वर्षांपूर्वी विशेषत: पठाराच्या खाली कपारींमध्ये त्यांनी पिल्लं दिलेली असायची. कालांतराने कुत्रे आणि कोल्ह्यांचा संकरही झाला असं गावकरी सांगतात. त्यातून आता कोल्हेही गावात कुत्र्यांसारखे फिरतात आणि कोल्हेकुई न करता भुंकतात अशी मजेशीर माहितीही मिळाली.
संध्याकाळी आश्रमाच्या अंगणातून समुद्राच्या साक्षीनं सूर्यदेव आपला निरोप घेतांना दिसतो. अंधाराची दाटीवाटी सुरु होते. बाहेरच्या पठारावर छान वारा वाहत असतो. खाली समुद्राची निळाई अंधारलेल्या आकाशाच्या रंगात मिसळून जाते. दूरवरून बोटींवरचे दिवे लुकलुकताना पहात आपण स्तब्ध होऊन जातो. तितक्यात शामरावांची आरतीसाठी हाक ऐकू येते. गावातला एखाद दुसरा माणूस, आणि शामरावांच्या कुटुंबांबरोबर आरती झाली की गरमगरम वरण भात आणि भाजीचा प्रसाद होतो.
अशा ठिकाणी गेल्यावर नेहमीच आपल्याला प्रसाधनगृह वगैरे आहे की नाही याची चिंता असते. पण दत्त मंदिराच्या पाठीशी येणाऱ्या जाणाऱ्यासाठी भारतीय आणि पाश्चात्य पद्धतीची नीटनेटकी स्वच्छतागृहे असलेल्या दोन चांगल्या खोल्या बांधल्या आहेत. इथं लाईट, पंखे सगळं आहे.आपण फक्त पथारी पसरायची.
आजूबाजूचा परिसर गडद अंधारात लुप्त होतांना शांत आणि तृप्त मनानं कधी झोप लागते ते कळत नाही.
— अनिरुद्ध अष्टपुत्रे
Anirudha Ashtaputre

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एमओयु