अंबाडा

 


तिच्या अंबाड्याची छोटीशी पुरचुंडी कधीची उलगडून गेली होती. विस्कटलेले पांढरे विरळ केस शेजारच्या नालीतल्या पाण्यावर तरंगत होते. तोंडावर केस चिकटलेल्या पिल्लांची अंबाड्याशी मस्ती कमी झाली नव्हती. गुंतलेल्या केसांमधल्या सुक्क्या फुलांशी खेळणं सुरूच होतं. पण आज नेहमीप्रमाणे म्हातारी त्यांना छातीशी लावत नव्हती. उगाउगाच रागावून परत आपला सुटलेला अंबाडा बांधत नव्हती. कंटाळलेल्या दोन्ही पिल्लांनी आता तिच्या निपचित अंगावरून उड्या मारून पाहिल्या, तिच्या चेहऱ्यावर आपले इवले इवले पंजे रोवून पाहिले. गुरगुरूनही झालं. इतका वेळ आपल्या पिल्लांचे खेळ कौतुकानं पाहणारी मरतुकडी आई सुद्धा आता समोरच्या फुटपाथवरून रस्ता क्रॉस करून आली. दोन्ही पिल्लांनी आईच्या दिशेनं धाव घेतली आणि लगेच तिला लुचू लागले. त्यांना प्रेमानं वस्कडा घालून तिनं म्हातारीजवळ बसकण मारली. त्या निपचित अंगावरची फाटकी साडी स्वत:च्या नाकाने वरखाली ओढून पाहिली.

हा अंबाड्याचा खेळ तसा येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी नेहमीचाच होता. दररोज सकाळी शाळेतली काही मुलं थोडं रेंगळून तो खेळ पहायची. मध्येच पिल्लांना हात लावायला पहायची पण म्हातारी लगेच अंगावर जायची. पिंकांनी लालेलाल भिंतीला टेकवलेल्या फाटक्या पोत्यातून ब्रेड बिस्कीट, केकचे तुकडे नाहीतर अर्धवट खाल्लेलं अन्न काढून समोर मांडायची, आणि मग हाका मारून मारून पिल्लांना बोलवायची. कुठूनतरी सगळं कुटुंब शेपट्या उडवत अवतीर्ण व्हायचं आणि मग त्यांची पंगत रंगायची. दुपारी रणरणत्या उन्हात आडोश्याला मुटकुळे करून पडलेली म्हातारी आणि तिच्याभोवती खेळणारी पिल्लं हे नेहमीचंचं होतं. रात्री आजूबाजूची गर्दी कमी होऊन सामसूम होऊ लागली की, म्हातारीची परत च्याऊम्याऊ पंगत. नंतर पसरलेल्या फाटक्या चादरीवर अंग टाकलेली पेंगुळलेली पिल्लं आणि राखण करणारी त्यांची जागी आई इतकंच काय ते दृश्य.

सकाळी दूध, पेपरवाले यांची ये जा सुरु झाली की, म्हातारीचा अंबाडा विस्कटायला पिल्लांची घाई सुरु. आळोखे पिळोखे देणारी म्हातारी पण त्याचीच वाट पाहत असायची. तोंडबिंड धुऊन पिल्लांशी लाडेलाडे बोलून त्यांच्या न्याहरीची व्यवस्था करणं हे म्हातारीचं नेहमीचं काम. पिल्लांच्या खाण्यात मध्येमध्ये तोंड खुपसणाऱ्या आईला पण म्हातारीचा ओरडा मिळत असे. जणू काही तिची स्वत:ची बाळं होती.

महानगरपालिकेच्या क्लिनअप गाडीच्या धडधडटानं सुद्धा म्हातारी हलली नाही. सफाईवाल्यानं कुणालातरी कॉल केला. एक दोन जण जाता जाता थबकले तेवढेच. पिल्लं त्यांच्याच तंद्रीत अंबाड्याशी खेळत होती नेहमीप्रमाणं. दीड दोन तासांनी म्हातारीच्या काड्या चादरीत गुंडाळून एका छोट्या एम्ब्यूलन्समध्ये पोहचल्या. मागोमाग आलेल्या हवालदारानं काहीतरी डायरीत लिखापढी केली.

एम्ब्यूलन्स गेली सुद्धा, पण पिल्लं चोळामोळा चादरीची ओढाताण करण्यात गुंग. आई सुद्धा जागा हुंगतेय अस्वस्थपणे. इतकं की, जवळच हळूच थांबलेल्या जीपमधून जाळी घेऊन उतरलेली माणसं बिचारीच्या गावीही नव्हती. अवघ्या पाच मिनिटांत जाळीमध्ये पाय वेडेवाकडे अडकलेली केविलवाणी आई आणि जीपमागं दुडदुडणाऱ्या पिल्लांच्या बरोबर गलका करीत पळणारी मुलं दूरदूरपर्यंत दिसत होते.

अनिरुद्ध अष्टपुत्रे

Anirudha Ashtaputre

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एमओयु