मौनाची धार
विक्रमादित्यानं फर्मान काढलं. ते ऐकून त्या छोट्याशा देशातले नागरिक हैराण झाले, घाबरले. आदेश असा होता की, राज्यातल्या नागरिकांनी बोलायचं नाही. संपूर्ण मूकपणे व्यवहार करायचे. एक शब्दही तोंडातून काढला तर त्या व्यक्तीस चौकात चाबकाचे शंभर फटके फारच आगाऊ आणि बेताल बोलला आहे असं न्यायाधीशांना वाटले तर, जी काही संपत्ती असेल ती सरकारदरबारी जमा.. अर्थातच यातून फक्त वैद्य, सुरक्षा रक्षक, शिक्षक वगैरे अत्यावश्यक सेवा देणारे वगळले होते. जे काही बोलायचे आहे ते कागदावर वगैरे लिहून सांगायचे. अगदी बाजारपेठेत गेलात, आणि भाव करायचा तरी कागदाच्या एखाद्या तुकड्यावर लिहायचं. विक्रेत्यानं न बोलता काय जे असेल हो नाही तो व्यवहार करायचा. अगदी शेजाऱ्यानं जरी तक्रार केली की, अमुक तमुक हा माणूस काहीतरी बोलला, तरी तक्रार खरी मानून जेलमध्ये उचलबांगडी होणार. बरोब्बर १५ दिवसानंतर आदेश लागू होणार होता. त्यामुळे तेवढ्या दिवसात मोठमोठे तात्पुरते तुरुंग उभारले गेले. ठिकठिकाणाहून लाखभर रक्षक भरती झाली…….
कुणीतरी गुरु महाराजांनी ग्रह तारे पाहून राजाला हा असा सल्ला दिला होता. राज्यातला कोलाहल, आवाज खूप वाढल्यानं राज्याची प्रगती खुंटली आहे, आणि परिस्थिती सुधारायची असेल तर शांततेशिवाय पर्याय नाही म्हणून. राज्यात गुण्यागोविंदाने लोकं रहात होती. त्या अख्या पंचक्रोशीत इतके संस्कारी, सुशिक्षित आणि कलागुणसंपन्न लोकं नव्हते. पण शेवटी देशाला आनंदी बनवायचे तर काहीतरी कठोर पाउल उचलले पाहिजेच नं.
पंधरा दिवसानंतर आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आणि देशभर स्मशान शांतता पसरली, फक्त नगरांमधील मार्गांवरून जाणाऱ्या बैलगाड्या, घोडागाड्या किंवा रथांचेच काय ते आवाज. सगळं चिडीचूप. सकाळ, दुपार, रात्र सगळे मूक. काही अगदीच महत्वाच्या सूचना असतील तर राज्याच्या सर्व नगरांमधून एक दवंडीवाला फिरायचा. मधेमधे राजाचे सैनिक साखळदंडांनी दाटीवाटीने कैदी घेऊन जातांना दिसायचे. त्यांचे केविलवाणे, रडके चेहरे भीतीदायक वाटायचे. भयाण शुकशुकाट पसरला. घरातल्या घरात कुजबुजायची पण भीती वाटू लागली….. हळू हळू राज्यातले व्यवहार ठप्प पडले. कार्यालये, व्यापारी पेठा ओस पडल्या. लोकं घराबाहेर पडायचे बंद झाले. कागदांच्या असंख्य चिटोऱ्यानी रस्ते, नाल्या, नाले, छोट्या मोठ्या महालांचे परिसर गच्च भरून जाऊ लागले. जिकडे पाहावे तिकडे अगणित रंगाच्या कागदांचे वेडेवाकडे तुकडे. कचरा वाहून नेणारेही थकले. त्यांच्या घोडागाडीची चाकं बुडतील एवढा कागदी कचरा जमा व्हायचा. मध्येच पाउस सुरु झाला, तेव्हा तर कितीतरी ठिकाणी भिजलेल्या कागदी लगद्याच्या भिंती तयार झाल्या. जोरात वारा आला तर कागदाचे लोटच्या लोट नगरावर ढगांसारखे इकडून तिकडे फिरायचे. लोकांच्या कपड्यांवर आता कागदाचे कपटे चिकटलेले दिसू लागले.. होता होता आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली. राज्यातली शाई सोन्याच्या भावानं विकणं सुरु झालं. लेखणी आणि शाईचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरु झाला. राजानं शाईचं रेशनिंग सुरु केलं. मारामाऱ्या सुरु झाल्या. हल्ले सुरु झाले. लेखण्या बनविणं बंद झालं. लेखण्या तयार करण्याचं साहित्य संपलं. लोकांनी विद्यालयांतल्या दगडी पाट्यांवर खडूनी लिहायला सुरुवात केली. मग करता करता खडू संपले. काही ठिकाणी वादावादीतून लोकांनी पाट्या डोक्यात घातल्या. एकदा तर दरबारातल्या एका सरदाराचा राग अनावर होऊन तो काहीतरी रस्त्यात कुणाला तरी बोलला. झालं, तो सरदार असल्याने त्याचा गुन्हा मोठा. चौकामध्ये चाबकाचे फटके मारले गेले.
तीन चार महिने कसे तरी गेले. कैदी वाढत होते. तुरुंग ओसंडून वाहू लागले. तुरुंगात कोलाहल वाढला. इतकं असूनही लोकं बोलायचा प्रयत्न का करताहेत त्याचे मुख्य कारण राजदरबाराला सापडले… लोकं मोठ्या संख्येने पुस्तकं, ग्रंथ, साहित्य वाचत होती. सारखं वाचायचं, मनात ठेवायचं पण कुठे व्यक्तही व्हायचं नाही. शब्दही काढायचा नाही, लिहिणे तर सोन्याच्या किंमतीपेक्षा महाग झालेले. निचरा कसा होणार ? नागरिक घुसमटू लागले. श्वास घ्यायला अनेकांना त्रास होऊ लागला. गुदमरून, मळमळून मार्गांच्या, गल्लीबोळांच्या कडेला पडू लागली. चांगली, सशक्त आणि तरुण माणसे श्वास कोंडल्यासारखी तडफडू लागली. राज्यातली उपचार केंद्रे बघता बघता भरू लागली. अगदीच असह्य झाल्यामुळे लोकं बोलायला बघायची तर लगेच हातात बेड्या चढायच्या.
शेजारच्या राज्याचा एक गुप्तहेर या सगळ्या कालावधीत तिथंच रहात होता. त्यानं हे सगळं पाहिलं आणि आपल्या समरदीप राजाला कळवलं. हीच योग्य संधी साधून त्यानं विक्रमादित्याचं राज्य हस्तगत करण्याचा डाव रचला. सुदैवानं याची कुणकुण विक्रमादित्यालाही लागली. मंत्री, सरदार आणि नंतर जनतेलाही कळलं. लोकं राजवाड्याच्या परिसरात घुटमळू लागले. हळूहळू गावोगावाहून लोकांची गर्दी राजधानीत होऊ लागली. एकदा विक्रमादित्यानं आपल्या गवाक्षातून खाली पाहिलं तर एवढा मोठा जनसमुदाय पाहून तो थबकलाच. प्रधानाला बोलावणं गेलं. त्यानं माहिती घेऊन सांगितलं. की, लोकं आपल्या राजावर इतकं प्रेम करतात की, प्राण गमवावे लागले तरी चालतील. पण राज्यासाठी लढू. राजा भारावून गेला पण भानावर होता. त्याला माहिती होतं, समरदीपचं सैन्य त्याच्यापेक्षा प्रबळ होतं. त्याच्याकडे शस्त्रास्त्रे सुध्दा जास्त होती. जास्त काळजी वाटण्यासारखी बातमी ही होती की, एक दोन दिवसांत राज्याला समरदीपच्या सैन्याचा वेढा पडणार होता. विक्रमादित्यनं आपल्या मंत्री आणि सेनापतीना घाईघाईने बोलवलं. राजमहालाबाहेर दूर क्षितिजावर शत्रू सैन्याच्या हालचालीमुळे धुळीचे लोट दिसू लागले होते. तितक्यात चिंतातूर विक्रमादित्याच्या कानात प्रधानानं काहीतरी सांगितलं. बराच वेळ राजा हलक्या आवाजात प्रधानाशी बोलत होता. शेवटी अचानक सगळ्या दरबाराकडे वळून त्यानं घोषणा केली…. आजपासून, नव्हे आत्तापासून राज्यासाठी काढलेला मौनाचा आदेश मागे.. आता राज्यातले नागरिक काय वाट्टेल ते आणि कितीही आणि कोणत्याही आवाजात एकमेकांशी बोलू शकतात. कोणतेही बंधन कोणावरही नाही…… पण नागरिकांनाही राज्यासाठी एक मोठं काम करायचं होतं….. राज्यभर दवंडी फिरली आणि दुपारपर्यंत हजारोनी नागरिक गगनभेदी आरोळ्या ठोकत समुद्रातल्या महाकाय लाटेसारखे राज्याच्या सीमेवर धडकले. सगळा आसमंत दुभंगेल असा कानठळ्या बसणारा आवाज सुरु झाला. आकाश कोसळले की भूकंप झाला असं वाटून गांगरलेल्या शत्रू सैन्याच्या पायातलं बळच गेलं. समोरून प्रलयंकारी आवाज करीत येणारी लोकांची एक प्रचंड मोठी भिंत पाहून समोरचे सैन्य अक्षरशः अवाक झालं. कर्णभेदी चित्रविचित्र ध्वनी करीत येणाऱ्या त्या जनसागराला प्रत्युत्तर देण्याची मनस्थिती समरदीपच्या सैन्याकडे नव्हती. अक्षरश: एका दिवसात विक्रमादित्यानं समरदीपच्या सैन्याला पळताभुई करून सोडली…..
गेली चार महिने विक्रमादित्याच्या राज्यातल्या नागरिकांनी आवाजाच्या शस्त्राला मौनाने जी धार करून ठेवली होती तिच्यासमोर कुणाचाही टिकाव लागणं अवघडच होतं
— — अनिरुद्ध अष्टपुत्रे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा