फ्रेम

 



हौदातल्या हिरव्यागार पाण्यात तीन चारदा कुणीतरी बुचकळलं. भावानं कसंबसं बाहेर काढलं तेव्हा सुटका झाली. तेवढ्यात बोंब ठोकणाऱ्या किडक्याला त्याच्या बाजूच्यानं त्याच हौदात फेकून आपला बदला पूर्ण केला. परत एकदा हौदाबाहेर गलका. अंगणातल्या छोट्या छोट्या रोपट्यांनी सुद्धा रंग खेळला होता, सगळीकडे नुसतं पाणी आणि रंगाचा चिखल.

एवढ्यात ओट्यावर पदर खोचून आई दिसली… हातात मोठी परात घेऊन. रंगांच्या आणि वॉर्निशच्या वासात सुद्धा गरमागरम कांदा भजींचा खरपूस वास असा पसरला की, सगळ्यांची झेप तिच्याकडे. क्षणार्धात भजी स्वाहा. पाठोपाठ बटाटा भजींचा अजून एक ढीग आला, तळलेल्या मिरच्यांच्या सोबत. आता हौदातली गर्दी ओट्यावर झाली. एकमेकांची खेचता खेचता दीड कधी वाजला कळलंच नाही. घरच्यांकडून निरोप आले आणि सगळे ‘रंग’कर्मी एकेक करून अदृश्य होऊ लागली.

तांब्याच्या ढणढण पेटलेल्या बंबातलं पाणी अंगावर शेकवत आंघोळ पार पाडली. हमामनं अंग रगडलं तरी रंग जाता जात नव्हता. जांभळ्या –हिरव्या रंगाच्या पाण्याचे लोट न्हाणीघरातल्या मोरीतून बाहेर अळूला जात होते. टॉवेलनं अंग खरडून चुणचुणत्या चेहऱ्यावर भसाभस पॉंन्डस लावून वेळ न घालवता थेट ओसरीवरच्या पंगतीत हजर. गरमागरम पुरणपोळ्या, कटाची आमटी, पंचामृत, कोशिंबीर आणि मठ्ठा.

पोटं तुडुंब भरल्या भरल्या माडीवर धाव घेतली. खिडकीतून आलेल्या कडकडीत उन्हाने सगळी खोली उबदार झालेली. माजघरातले आवाजही हळूहळू विरले. खाट खिडकीकडे सरकवून मोहोरलेल्या आंब्यावरचा चिमण्यांचा खेळ पहात डोळा कधी लागला ते कळलंच नाही.

जाग आली ती आईच्या सुरकुतल्या माय स्पर्शानं. अंधारलेल्या खोलीत तिची आकृती एका हातात वाफाळलेला चहा घेऊन. “उठ चहा घे नाना. आवरलीये का बॅग? सहा वाजले. गाडी चुकेल मागच्या वेळसारखी. आता मामा येईल. तो सोडेल तुला. डब्यात तुझ्या आवडीचं दिलंय खायला.

स्कूटर गल्लीतून मेन रोडवर आली. आणि झाडांमध्ये लपलेलं छोटंसं घर परत दिसलं.. दूर दूर जात्ताना. डोळे मात्र ओसरीतल्या आई बाबांच्या अंधुक आकृत्या अधाशासारखे साठवत होते. हळूहळू ओसरीची एक धुरकट फोटो फ्रेम बनली.

अनिरुद्ध अष्टपुत्रे

Anirudha Ashtaputre

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एमओयु