मिसेस शहा व्हर्सेस जर्मनी

 



‘मिसेज चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा सागरिका चक्रवर्ती यांचा अभूतपूर्व न्यायालयीन लढा नुकताच पडद्यावर पाहिला होता. नार्वेत राहणाऱ्या सागरिका आणि अनुरूप या जोडप्याची दोन लहान मुलं चाइल्ड वेलफ़ेयर सर्विस (एनसीडब्ल्यूएस) ताब्यात घेते. आरोप हाच की दोघंही योग्य रीतीने मुलांचा सांभाळ करू शकत नाहीत. आईचेच दूध पिते तान्हुले वेल्फेअर सर्व्हिसेसचे अधिकारी अक्षरश: हिसकावून घेऊन जातात. बारा वर्षांपूर्वीच्या या करुण सत्यकथेचा अजून दि एंड झालेला नाही. चित्रपटात जरी या मुलांची कस्टडी न्यायालय मिसेस चॅटर्जीला म्हणजे राणी मुखर्जीला देतांना दाखवले असले तरी प्रत्यक्षातल्या सागरिका चक्रवर्ती पुण्यात आहेत आणि त्यांच्या मुलांचा संभाळ त्यांचे आई वडील कोलकत्याला करताहेत.

कालच मुख्यमंत्री सचिवालयात धारा शहा नावाची महिला येऊन गेली. ही दुसरी सागरिका चक्रवर्तीच. भाईंदरला राहणारी. फरक एवढाच की तिथे नार्वे सरकार होतं, धाराच्या बाबतीत जर्मन सरकार आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये बर्लिनमध्ये राहणाऱ्या धारा — भावेश जोडप्याला अरिहा झाली. सात महिनेच झाले असतील. अरिहाच्या अंगावर ओरखडे आणि डायपरवर रक्त दिसलं म्हणून हे दोघं बर्लिनमध्येच एका डॉक्टरकडे दाखवायला गेले. त्याने उपचार तर केले पण अरिहावर लैंगिक अत्याचार झाले असावेत असा अंदाज करून सरळ चाईल्ड सर्व्हिसेसला कळविले. त्यांनी येऊन थेट चिमुकल्या अरिहाला ताब्यातच घेतलं. झालं…. इथून सुरु झाला एक न संपणारा लढा… कालांतरानं वैद्यकीय रिपोर्टही आला की अरिहाच्या अंगावरचे ओरखडे लैंगिक अत्याचारामुळे नाहीत. पण यामुळे सुटका झाली नाही. आज जर्मनीतल्या बाल संगोपन केंद्रात अरिहा अडकली आहे. तिला नेलं त्यावेळी ती सात महिन्याची होती. आता ती अडीच वर्षांची झाली आहे…. आई वडिलांशिवाय.

भावेशची बर्लिनमधली नोकरी सुटली आहे. व्हिसा संपायला दोनच महिने राहिले आहेत. जर्मन सरकार ठाम आहे की, हे दोघंही मुलीचा सांभाळ करू शकत नाहीत. ‘फिट टू बी पेरेंट्स’ सर्टिफिकेट आणा म्हणतात. धारा आणि भावेश योग्य पालक नाहीत हे सिद्ध करण्याचा जर्मन सरकारने जणू चंगच बांधला हे. त्यामुळे आणखीही काही कारणं जोडली आहेत. मुलीला नीट शिकवत नाहीत, इतरांशी कसं वागायचं ते सांगत नाहीत, अरिहा कुणीही बोलवले तर पटकन समोरच्या व्यक्तीकडे जाते, आंबा हातात धरून खाते वगैरे वगैरे.

अरिहाचे बोबडे बोबडे बोल आठवणाऱ्या धाराला दिवसरात्र केवळ अरिहा दिसते. आपली मुलगी अडीच वर्षांची झाली आहे पण तिला भेटू शकत नाही. आईचे प्रेम देऊ शकत नाही, हा विरह आभाळाएवढा आहे. आता त्यांचा व्हिसा संपत असल्याने परत एकदा धाराने जर्मन सरकारचे दार ठोठावले पण त्यांना निष्ठूरपणे सांगण्यात आले की डोंट वरी, वुई विल अरेंज युअर गुडबाय मिटिंग विथ हर. धाराच्या म्हणण्यानुसार जर्मनी, नार्वे यासारख्या देशातून इतर देशांनी अशाच प्रकरणात आपली मुलं बाहेर काढली आहेत.

आपल्या परराष्ट्रमंत्रालयानं सुद्धा याबाबत जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे विनंती केली आहे. चिल्ड्रेन फर्स्ट अशी या देशांची भूमिका असते म्हणे. अरिहाचे कल्याण आणि तिचं हित आम्ही पाहू, प्रकरण न्यायालयात आहे अशी जर्मनीची भूमिका आहे. धारा आणि भावेश यांनी आपल्या मागणीसाठी उपोषणही करून झालं आहे.

आता ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सचिवालयातआल्यावर आपल्या परराष्ट्र खात्याकडे कशा पद्धतीनं पाठपुरावा करता येईल आणि धाराला न्याय मिळेल याचा प्रयत्न सुरु झाला आहे, तो होत राहील. अरिहाला तिची मम्मी मिळेल अशी आशा करू, पण यानिमिताने नार्वे, जर्मनीसारख्या देशांमधला चाईल्ड प्रोटेक्शनचा मुद्दा एकदमच ऐरणीवर आला आहे. आपली आई आपल्या मुलांची वैरीण कशी ठरू शकेल? दोन देशांत सांस्कृतिक फरक असतातच, वेगळी जीवन पद्धती असते. आई वडिलांनी, आजी मावश्यांनी आपल्याला त्यांच्या हातानं भरवून आपलं पालन पोषण केले आहे. लहानपणी आपलं उठणं, बसणं, झोपणं, आई वडिलांबरोबरचं झालंय. नियम दाखवून मुलांना आपल्या पालकांपासून दूर करण्याचा हा श्रीमंत देशांचा अमानुषपणा माणुसकीला धरून आहे?

— अनिरुद्ध अष्टपुत्रे

Anirudha Ashtaputre





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एमओयु